इतना सन्नाटा क्यू है भाई !

Foto
लोकसभेचा रणसंग्राम जोरात सुरू झालाय. औरंगाबादच्या लोकसभेचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले. आरोपांच्या फैरी झडताहेत. मात्र शिवसेनेचे नेते चकार शब्दही बोलायला तयार नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीही या नेत्यांनी गप्प राहणे पसंत केले. गेली दोन दिवस इतर पक्षाचे उमेदवार आरोपांच्या फैरी झाडत असताना शिवसेनेचे गप्प राहणे खटकत आहे. त्यामुळे ‘इतना सन्नाटा क्यू है भाई‘ असा प्रश्‍न पडला आहे. 

काँग्रेस, एमआयएम  यासह  शिवस्वराज्य पक्षांच्या  उमेदवारांनी  आरोपांची राळ उठवली. सुभाष झांबड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सेनेसह सर्वच पक्षांवर  टीकास्त्र सोडले. स्वपक्षातील  विरोधकांनाही त्यांनी टोला लगावला.  दंगलीचा उल्लेख करीत  शिवसेना एमआयएमवर प्रहार केला.  खरे तर  झांबड यांनी स्वपक्षातील लोकांवर टीका करणे मुळीच संयुक्तिक नाही. कारण अब्दुल सत्तार यांच्या नादी लागलेले लोक  एकतर राजकारणातून बाहेर फेकले गेलेले आहेत अथवा लवकरच बाहेर फेकले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या वाटेला न जाणेच योग्य! सत्तारांचा  रोख पाहता त्यांना काहीही गमवावे लागणार नाही, असे दिसते. त्यामुळे आपलं शाबूत ठेवून सत्तार इतरांच्या घरात लुडबुड करीत आहेत, हे कुणालाही समजेल. सत्तार यांची मनधरणी करणार नाही, हा झांबड यांचा पवित्रा  योग्यच म्हणावा लागेल. सत्तार किती अडचणी निर्माण करू शकतात याची गोळाबेरीज करताना सत्तार विरोधानेही झांबड यांचा फायदाही होऊ शकतो, ही बाबही तितकीच खरी. त्यामुळे  स्वपक्षातील  लोकांवर टीका करून  सत्तार यांच्या पथ्यावर पडणार्‍या गोष्टी करून झांबड स्वतःचेच नुकसान करून घेत आहेत.  

‘एमआयएम’ने धडाक्यात प्रचार सुरू केलाय. पत्रकारितेचा पिंड असलेल्या आमदार जलील यांनी कोणते मुद्दे प्रभावशाली ठरतील अन् कोणत्या मुद्यावर जोर द्यायचा हे ठरवून टाकले. आचारसंहितेपूर्वी नशामुक्त शहराची घोषणा करून त्यांनी दिशा स्पष्ट केली होती. याद्वारे अधिकाधिक महिला मतदारांना आकर्षित करण्याचे काम त्यांनी पद्धतशीरपणे केले. आता हळूच त्यांनी गरीब कार्ड पेश केले आहे. सहानुभूती मिळवून वोट आणि नोट या दोन्ही गोष्टींची तजवीज या निमित्ताने होईल, असा जलील यांचा होरा आहे. माझ्यासमोर धनाढ्य आणि बलाढ्य उमेदवार असल्याचा दावा ते करतात. यावर मतदार प्रभावित होण्याची खात्री  त्यांना वाटते. मात्र गरीब कार्ड चालेलच याची खात्री नाही. जनतेला स्वच्छ आणि वेगवान प्रशासन हवे आहे. शहरात कचरा पाणी रस्ते हेच मुद्दे प्रभावी ठरणार आहेत. अशावेळी जलील यांच्या गरीब कार्डाला मतदार भुलणार नाहीत, असे दिसते. शहरासह ग्रामीण भागात पाण्यासाठी जनता वणवण भटकंती करते आहे. पाण्याचा मुद्दा ‘घर घर की बात’ होऊ शकते. त्याचा जो खुबीने वापर करेन त्यालाच यश मिळेल. मात्र असे होईल का, हाच खरा प्रश्‍न आहे. चाणाक्ष राजकारणी जनतेला वेगळ्याच मु्द्याकडे घेऊन जातील आणि आपला स्वार्थ साधतील शंका नाही. विकास हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवला तर जनतेचे अन शहराचेही भले होईल, यात शंका नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker